गङ्गा सरस्वती सिन्धुर्ब्रह्मपुत्रश्च गण्डकी ।
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ।।५।।
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ।।५।।
भारतातील सर्वात पवित्र नदी, जिला 'पापनाशिनी', 'सुसरीता', 'भागीरथी', 'जान्हवी' इ. अनेक नावांनी संबोधले जाते. हिमालयातील गंगोत्री
हिमानीच्या गोमुख विवरातून उगम पावून गंगा हिमालयातील अनेक पर्वतरांगा-शिखरावरून
हरिद्वार येथे मैदानी प्रदेशात प्रवेश करते. उत्तरप्रदेश, बिहार, बंगालच्या
भूभागांना पावित्र्य प्रदान करीत ती गंगासागर येथे समुद्रास मिळते. ऋग्वेदातील
नदीसूक्तानुसार भारतातील सर्वात प्राचीन नदी गंगा आहे. गंगेच्या किनाऱ्यावर
हरिद्वार, प्रयाग, काशी सारखे अनेक सुप्रसिद्ध पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत.
गंगेच्या किनाऱ्यावरच अनादी काळापासून ऋषी, मुनी, तपस्वी लोक साधना करीत आले आहेत. पवित्र व निर्मलतेला
गंगाजलाची उपमा दिली जाते. गंगाजलाची स्वयंशुद्धीची क्षमता ही जगातील सर्व
पाण्यापेक्षा अधिक असल्याचे वैज्ञानिक प्रयोगांनी सिद्ध झाले आहे. या पावन नदीस
हिंदू समाज माता किंवा मैय्या म्हणून संबोधतो. पुरणांनुसार गंगा ही विष्णूच्या
चरणापासून उत्पन्न झाली, ब्रह्मदेवाच्या
कमंडलूमध्ये सामावली जाऊन भगवान शंकरांनी तिला आपल्या जटेमध्ये धारण केले. सागरवंशीय
राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी गंगेस पृथ्वीवर अवतीर्ण केले.
भागवत पुराणामध्ये यासंबंधी विस्तृत कथा दिलेली आहे. आदित्य पुराणानुसार गंगेचे
पृथ्वीवर अवतरण हे वैशाख शुद्ध तृतीयेस झाले तसेच हिमालयातून गंगा ज्येष्ठ शुद्ध
दशमीस प्रवाहित झाली.
No comments:
Post a Comment