प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् ।
इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।।
शीख पंथियांचे प्रमुख तीर्थस्थान असलेले हे पंजाबमधील धार्मिक व ऐतिहासिक नगर आहे. या नगरीतील तीर्थस्थळनिर्मितीचा शुभारंभ शीख पंथातील चौथे गुरू श्री रामदासजी यांच्याकडून इ. स. १५७७ मध्ये झाला. मंदीर निर्मितीपूर्वीच चहूदिशांनी एक तलाव खोदण्यात आला. मंदीर निर्मितीचे कार्य पाचवे गुरू अर्जुनदेवांनी हरिमंदिर बनवून पूर्ण केले. सरोवर व हरिमंदिराच्या चारही दिशांना भव्य दरवाजे आहेत, ज्यामुळे सर्व बाजूंनी श्रद्धाळू भक्तगण प्रवेश करतात. महाराज रणजितसिंह यांनी या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी खूप द्रव्य खर्च केले. १३ एप्रिल १९१९ रोजी इंग्रज शासनाच्या काळात या सुवर्णमंदिरापासून दोन फर्लांग अंतरावर असलेल्या जालियनवाला बागेत स्वातंत्र्यमागणी करणारी शांततापूर्ण सभा चालू असताना जनरल डायरने नृशंस गोळीबार केला, प्रचंड नरसंहार झाला. इथे या बलिदानी हुतात्म्यांच्या स्मरणार्थ स्मारक निर्मिलेले आहे.






