Friday, June 14, 2019

काशी

अयोध्या मथुरा माया काशी काञ्चि अवन्तिका ।
वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया ।।६।।

पूर्व उत्तर प्रदेशातील गंगा किनाऱ्यावर वसलेली शिवमहिमामंडित काशी नगरीची गणना विश्वातील प्राचीनतम नगरीमध्ये होते. वरूणा नदी आणि असी गंगेच्या मध्ये काशी नगरी वसलेली असल्यामुळे हिला वाराणसी असेही म्हटले जाते. बौद्ध जातक कथांनुसार महाजनपदाची काशी ही राजधानी भारतातील सहा प्रमुख नगरांमध्ये सर्वात मोठे नगर होते. अनेकविध विद्याशाखांचे अध्ययन केंद्र, भिन्न-भिन्न संप्रदायांचे तीर्थस्थान आणि
परमेश्वर प्राप्तीसाठी साधना करण्यास उपयुक्त स्थान असे काशीचे महात्म्य आहे. काशी क्षेत्रामध्ये शैव, शाक्त, बौद्ध आणि जैन पंथांची प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत. काशीमधील विश्वनाथ मंदिरातील शिवलिंग हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. काशीमध्ये शक्तीपीठ सुद्धा आहे. सातव्या आणि तेविसाव्या जैन तीर्थांकरांची जन्म व कर्मभूमी काशीच आहे. भगवान बुद्धांनी काशीजवळील सारनाथ येथे त्यांचे पाहिले धम्मप्रवचन केले होते. कोणत्याही नवीन पंथ, विचार, सुधारणांचा प्रारंभ काशीपासून करणे यशस्वीतेसाठी आवश्यक मानले जात असे. कबीर, रामानंद, तुलसीदास सारख्या भक्त व संतकवींनी काशीला त्यांची कर्मभूमी मानले होते. शास्त्राध्ययन आणि शास्त्रार्थाची काशीमध्ये अत्यंत प्राचीन परंपरा आहे. मोगल आक्रमक औरंगजेबाने येथील विश्वनाथ मंदीर उध्वस्त करून तिथे एक मशीद बांधली. कालांतराने या मशिदीजवळच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी नवीन विश्वनाथ मंदीर बांधले. या मंदिराच्या शिखरास महाराज रणजितसिंह यांनी सुवर्णपत्र्याने मढविले. काशी विश्वनाथाच्या मूळस्थानास मुक्त करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
आधुनिक काळात महामना मदनमोहन मालवीय यांनी इथे जगप्रसिद्ध काशी हिंदू विश्वविद्यालायाची स्थापना केली व शिक्षणक्षेत्रात काशीची परंपरा पुढे चालविली. येथील गंगातटावर दशश्वमेधघाट प्रसिद्ध आहे. इथेच भारशिव राजांनी आक्रमक कुशाणांना पराभूत करून दहा अश्वमेध यज्ञ केले होते.

No comments:

Post a Comment

अमृतसर

प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् । इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।। शीख पंथियांचे प्रमुख तीर्थस्थान असलेले हे पंजा...