Monday, December 10, 2018

रैवतक पर्वत

महेन्द्रो मलयः सह्यो देवतात्मा हिमालयः ।
ध्येयो रैवतको विंध्यो गिरिश्चारावलिस्तथा ।।४।।


गुजरात प्रांतामध्ये काठियावाड जिल्ह्यात प्रभास परिसरातील पवित्र गिरनार पर्वत म्हणजे रैवतक होय. द्वारकेपासून थोड्या अंतरावर आहे. 'माघ' रचित 'शिशुपाल वध' नाटकात या पर्वताचे सुंदर वर्णन आहे. पुराणातील उल्लेखानुसार भगवान शंकराचा या पर्वतावर निवास होता. अनेक दैवतांना याच पर्वतावर निवास करण्याचा शंकरांनी आग्रह केला होता. सर्व देवतांसहित भगवान शंकराचे निवासस्थान रैवतक पर्वत असल्याची मान्यता आहे. या पर्वतांमध्ये अनेक तिर्थकुंड आणि मंदिरे विद्यमान आहेत. जैन पंथाची अनेक मंदिरे या पर्वतावर आहेत. या पर्वतशृंखलांमधील गोरखनाथ शिखर हे सर्वात उंच शिखर आहे.

हिमालय

महेन्द्रो मलयः सह्यो देवतात्मा हिमालयः ।
ध्येयो रैवतको विंध्यो गिरिश्चारावलिस्तथा ।।४।।

भारताच्या उत्तरेस असलेला, सदैव बर्फाच्छादित, जगातील सर्वोच्च पर्वत, ज्यास कविकुलगुरू कालिदासांनी 'देवतात्मा' या विशेषणाने संबोधित केलेले आहे. (अस्युतरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः) उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणांना रोखण्यात भक्कम भिंतीप्रमाणे हिमालयाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. हा पर्वत भारतातील अनेक नद्यांचे उगमस्थान आहे. गंगा, यमुना, सिंधू, ब्रह्मपुत्रा या सारख्या अनेक नद्या हिमालयातून उगम पावल्या आहेत. भगवान शंकराचे प्रिय निवासस्थान कैलास सुद्धा हिमालयावरच आहे. नर-नारायणाचे पवित्र स्थान याच पर्वतावर आहे. गंगोत्री, यमुनोत्री, मानसरोवर, बद्रीनाथ, केदारनाथ सारखे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र याच पर्वतशृंखलावर विराजमान आहेत. हिमालयाच्या क्षेत्रातच महाराज भगीरथाने गंगेच्या प्रवाहित होण्यासाठी घोर तपश्चर्या केली होती. याच पर्वतावर देवी पार्वतीने जन्म घेतला, ज्यांनी आपल्या महान तपश्चर्येने भगवान शंकराला पतिरूपाने प्राप्त केले. भगवान वेदव्यासांनी याच पर्वतांमध्ये अनेक महान ग्रंथांची रचना केली. महाभारत युद्धानंतर पांडवांनी हिमालय गमन करून ऐहिक जीवन कृतार्थ केले होते. भारतातील अनादी काळापासून सांस्कृतिक सनातन जीवनगाथा हिमालयाशी जोडलेल्या आहेत. युगानुयुगे हिमालय हा ऋषी, मुनी, योगी, तपस्वी, दार्शनिकांचे निवासस्थान राहिलेला आहे.

सह्याद्री

महेन्द्रो मलयः सह्यो देवतात्मा हिमालयः ।
ध्येयो रैवतको विंध्यो गिरिश्चारावलिस्तथा ।।४।।



भारताच्या पश्चिमी समुद्र किनाऱ्यालगत महाराष्ट्र व कर्नाटक प्रांतातील गोदावरी व कृष्णा नद्यांचे हा पर्वत उगमस्थान आहे. सह्य पर्वत म्हणजे सह्याद्री. या पर्वत शिखरांवर तसेच यातून उगम पावलेल्या नदी किनाऱ्यांवर त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर, पंचवटी, मंगेशी, वाळूकेश्वर, करवीर इ. अनेक तिर्थस्थळे अस्तित्वात आहेत. हा पर्वत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आधारक्षेत्र राहिलेला आहे. अनेक ऐतिहासिक किल्ले या पर्वतावर आहेत. शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळा, विशाळगड, पुरंदर, सिंहगड आणि रायगड हे या पर्वतावरील प्रमुख उल्लेखनीय ऐतिहासिक किल्ले आहेत.

मलय पर्वत

महेन्द्रो मलयः सह्यो देवतात्मा हिमालयः ।
ध्येयो रैवतको विंध्यो गिरिश्चारावलिस्तथा ।।४।।


भारतीय वाङ्मयात मलय पर्वताचे वर्णन अनेक कवींनी केले आहे. चंदनवृक्षासाठी प्रसिद्ध असलेला हा पर्वत कर्नाटक प्रांतातील मैसूर मध्ये अस्तित्वात आहे. 'निलगिरी' नावानेही हा पर्वत ओळखला जातो कारण या पर्वताचे एक शिखर निलगिरी म्हणून प्रख्यात आहे.

महेंद्र पर्वत

महेन्द्रो मलयः सह्यो देवतात्मा हिमालयः ।
ध्येयो रैवतको विंध्यो गिरिश्चारावलिस्तथा ।।४।।


ओडिशा प्रांताच्या (उत्कल) गंजाम जिल्ह्यातील पूर्वभागातील सर्वोच्च पर्वत शिखर. या पर्वतावर चार विशाल ऐतिहासिक मंदिरे आहेत. चौलराजा राजेन्द्राने या पर्वत शिखरावर ११व्या शतकात एक विजयस्तंभ प्रस्थापित केला आहे. स्थानिक जनसामान्यांची अशी श्रद्धा आहे की, सात चिरंजीवांपैकी एक परशुराम हे या पर्वतावर संचार करीत असतात. या पर्वतामधून महेंद्र - तनय नावाच्या दोन पर्वतरांगा निघतात.

एकात्मता स्तोत्र ३

रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिणीम् ।
ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्देभारतमातरम् ।।३।।

रत्नांची खाण असलेला समुद्र जिचे पाय धूत असतो, हिमालय जिचा मुकुट आहे, ब्रम्हर्षी आणि राजर्षीरुपी रत्नांनी समृद्ध अशा भारतमातेस मी वंदन करतो

एकात्मता स्तोत्र २

प्रकृति: पञ्चभूतानि ग्रहा लोका स्वरास्तथा ।
दिश: कालश्च सर्वेषां सदा कुर्वन्तु मङ्गलम् ।।२।।

तीन गुणांनी युक्त प्रकृती, पंचमहाभूते, नऊ ग्रह, तीन लोक किंवा सात ऊर्ध्वलोक व सात अधोलोक, सप्तस्वर, दशदिशा आणि तीन काळ सदैव सर्वांचे मंगल करोत.

प्रकृती: सांख्य दर्शनानुसार सृष्टीचे मूळ उपादान कारण (व्यक्त होण्याचे कारण) मूळ स्वरूपत:च जड (अचेतन), अमूर्त (निराकार) आणि त्रिगुणात्मक (सत्व-रज-तम) आहे, हेच "प्रकृती" या नावाने ज्ञात आहे. प्रकृतीचे तीन गुण आहेत, सत्व, रज आणि तम, यांच्या साम्यावस्थेमध्ये सर्व काही अमूर्त, निराकार असते. अशा जड प्रकृती मध्येही चैतन्यमय ईश्वरी तत्त्वाच्या सान्निध्याने चेतनेचा आभास निर्माण होतो. सत्व, रज, तमाचे साम्य भंग होऊन हे गुण परस्परांचे दमन करून प्रत्येक गुण प्रभावी होण्याचा प्रयत्न करतो व या क्रियाकलापांमुळे चेतनेचा आभास निर्माण होत असतो. या सोबतच सृष्टीक्रम प्रारंभ होतो. अद्वैत दर्शनामध्ये सृष्टीला मिथ्या किंवा आभासी मानले जाते. वास्तविकपणे एकंदरीत भारतीय विचारांमध्ये चेतनाभासी प्रकृती व मिथ्या मायेला एकाच शक्तीची दोन रूपे मानले गेले आहे.

पंचमहाभूते: भारतातील जनसामान्यांनाही आपले शरीर पंचमहाभूतांनी बनलेले असल्याची दार्शनिक संकल्पना अवगत आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश या तत्त्वांना पंचमहाभूते म्हटले आहे. सांख्य दर्शनानुसार सृष्टीक्रमामध्ये सत्व, रज, तम या गुणांचे संतुलन बिघडताच शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पाच गुण आणि पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभूतांचे सृजन होऊन पुन्हा विश्वनिर्मिती होत असते. ही पंचमहाभूते स्थूल स्वरूपात नसून सूक्ष्मरूपात असतात.






ग्रह: सामान्यपणे सौरमंडलातील सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या स्थूल पदार्थपिंडांना ग्रह म्हणतात. ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या सौरमंडलात मंगल, बुध, गुरू, शुक्र व शनी नावाचे पाच ग्रह आहेत, या व्यतिरिक्तही सूर्य, चंद्र तसेच राहू, केतू हेही खगोलशास्त्रीय ग्रह मानले जाऊन एकूण नऊ ग्रह मानले जातात. या सर्व ग्रहांची निर्मिती व अस्ताच्या वेळा तसेच गतीचे अध्ययन गणित ज्योतिषामध्ये केलेले आहे. फलज्योतिषानुसार सर्व ग्रहांच्या गतिविधींचा शुभाशुभ प्रभाव पृथ्वीवरील प्राणीमात्रावर पडत असतो. 
गुरुत्वाकर्षणामुळे समुद्रातील भरती-ओहोटीसारखे दृश्य परिणाम होतात तसेच विद्युतचुंबकीय प्रभावास आधुनिक विज्ञानही मान्यता देते. पुराणांमध्ये राहू व केतूचा उल्लेख एका राक्षसाचे धड व कापलेल्या मुंडाक्याच्या रूपात केला जातो. समुद्रमंथनानंतर या राहू-केतूंनीच देवांमध्ये जाऊन चोरून अमृत पिल्याचा उल्लेख आहे. चंद्र-सूर्याकडून ही माहिती मिळताच विष्णूने सुदर्शन चक्रानी त्याचा शिरच्छेद केला होता. मंगलकार्याच्या वेळी नवग्रहांची पूजा केली जात असते.

लोक: वेदांमध्ये अनेक लोकांचा उल्लेख आहे, प्रकाशमय देवलोक तसेच अंधःकारमय असूरलोकाचा उल्लेख आहे. पुराणांमध्ये खलील चौदा लोकांचे वर्णन केले आहे - भूलोक, भुवर्लोक, स्वर्लोक, महर्लोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक हे सात ऊर्ध्वलोक आहेत. पुढील सात अधोलोक आहेत - अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताळ. या चौदा लोकांना चौदा भुवने सुद्धा म्हणतात. भूलोक हा कर्मलोक आहे. मनुष्यजन्म आणि कर्माचा आधार असलेला हा भूलोक आहे. या लोकापासून सर्व ऊर्ध्वलोकांमध्ये शुभकर्म करणाऱ्या सत्प्रवृत्त प्राणिमात्रांचा निवास असतो तर सर्व अधोलोकांमध्ये अशुभ कर्म करणाऱ्या अधम प्रवृत्तीच्या प्राणिमात्रांचे वास्तव्य असते.

स्वर: भारतीय दर्शनानुसार आकाशामध्ये "शब्द" गुण आहे परंतु इथे शब्दाचा अर्थ ध्वनी नसून कंपन तरंग असा आहे. शब्दांची ध्वनी रूपात अभिव्यक्ती म्हणजे "स्वर" होय. स्वराज नादब्रह्मही म्हटलेले आहे.
संगीत शास्त्रात ध्वनीच्या मूळ स्रोतांना श्रुती म्हटले आहे व या श्रुतीची संख्या २२ आहे. एकापेक्षा अधिक श्रुतीच्या नादमय संयुक्त रूपास स्वर म्हटले जाते. संगीतामध्ये एका सप्तकात पुढील सात स्वर असतात: षड्ज, ऋषभ, गंधार, मध्यम, पंचम, धैवत, निषाद ( सा रे ग म प ध नि) या सात स्वरांचा क्रम पूर्ण होताच यापेक्षा दुप्पट आवृत्तीचे दुसरे सप्तक सुरू होत असते. भारतीय संगीतातील या तीन सप्तकांना अनुक्रमे मंद्र, मध्य आणि तार सप्तक म्हणतात. या सर्व शुद्ध स्वरांच्या व्यतिरिक्त कोमल ऋषभ, कोमल गंधार, तीव्र मध्यम, कोमल धैवत आणि कोमल निषाद या पाच विकृत स्वरांनाही भारतीय संगीतामध्ये मान्यता दिलेली आहे.
भारतीय भाषांच्या वर्णमालेतील अ, आ, इ, ई... इत्यादी १४ वर्णाक्षरांच्या ध्वनीउच्चारणाचे स्वतंत्र स्वरूप असते. तसेच क्, ख्, ग्, घ् ङ् इत्यादी व्यंजन वर्णाक्षरांसहित ध्वनीउच्चारण केल्यानंतर स्वतंत्र, पृथक स्वरूपात उच्चारण होते. उच्चारणातील तीव्रतेच्या दृष्टीनेही उदात्त, अनुदात्त व स्वरित असे तीन स्वर प्रकार आहेत.

दिशा: पुढील दहा दिशा आहेत - पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय (दक्षिण पूर्व), नैऋत्य (दक्षिण पश्चिम), वायव्य (उत्तर पश्चिम), ईशान्य (उत्तर पूर्व), ऊर्ध्व (वर) व अध: (खाली)

काल: घटनांमध्ये पूर्वी व नंतरचा बोध होणाऱ्या प्रत्ययांचा गती आणि परिवर्तनाशी संबंध असतो. भारतीय तत्त्वज्ञांनी काळास चक्रीय किंवा पुनरावर्ती मानलेले आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुगांचे वारंवार पुनरावर्तन होत असते. या प्रमाणेच भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळाचे सुद्धा निरंतर पुनरावर्तन सुरूच असते. भारतीय कालगणनेमध्ये 'निमिष' (म्हणजे पापणी झडपण्याइतपत वेळ) पासून कल्प (म्हणजे सृष्टीच्या एका अस्तित्वाचा काळ) पर्यंत विचार झालेला आहे. उपरोक्त चार युगांचे एक महायुग (४३ लक्ष २० हजार वर्षे) आणि १००० महायुगांचे एक कल्प होत असते. पुराणानुसार हे कल्प म्हणजे सृष्टीकर्ता ब्रह्माचा एक दिवस असतो. हा एकवेळ सृष्टीच्या अस्तित्वाचा कालावधी आहे. हे एक कल्प पूर्ण होताच महाप्रलय होऊन सृष्टीचे विसर्जन होते व पुन्हा सृष्टीचे सृजन सुरू होते. हे उत्पत्ती, स्थिती व लयाचे चक्र निरंतर सुरू असते.

तीन गुणांनी युक्त प्रकृती, पंचमहाभूते, नऊ ग्रह, तीन लोक किंवा सात ऊर्ध्वलोक व सात अधोलोक, सप्तस्वर, दशदिशा आणि तीन काळ सदैव सर्वांचे मंगल करोत.

Friday, October 19, 2018

एकात्मता स्तोत्र १

ॐ नमः सच्चिदानंदरूपाय परमात्मने ।
ज्योतिर्मयस्वरूपाय विश्वमांगल्यमूर्तये ।।१।।

ॐ ज्योतिर्मय, प्रकाशमान स्वरूपात प्रगटणारा, विश्वाचे कल्याण करणारा, सत् चित् आनंद स्वरूपी हे परमात्मा तुला नमस्कार असो.

ॐ हा परब्रह्मवाचक , परमेश्वरी शक्तीचा द्योतक शब्द आहे, ज्यास प्रणवमंत्रही म्हटले जाते. या शब्दास सृष्टीचा आद्य ध्वनी मानले जाते. संपूर्ण अवकाशात अव्यक्तस्वरूपही व्याप्त असणारे हेच शब्दब्रह्म आहे. पुराणे आणि स्मृतिग्रंथानुसार सृष्टीच्या उत्पत्तीसमयी सृजनकर्ता ब्रह्मदेवाच्या मुखातून सर्वप्रथम निघालेला हा शब्द आहे. ॐ हा शब्द अत्यंत मंगल मानला जातो. वेदपारायण किंवा कोणत्याही शुभ कर्माच्या प्रारंभी व समाप्तीच्या प्रसंगीही या प्रणवाचा उच्चार केला जातो. ॐ हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे प्रतीक मानले जाते. अ, उ, म् यांचा मिळून ॐ उच्चार होतो आणि अ म्हणजे ब्रह्मा (सृजनकर्ता), उ म्हणजे विष्णू (पालनकर्ता) व म् म्हणजे महेश - महादेव (संहारकर्ता). सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लयाचे प्रतीक म्हणजे ॐ होय. हा शब्द शुभ असल्याने स्वीकृती व संमतीदर्शक अर्थानेही या शब्दाचे उच्चारण करण्याची प्रथा आहे. सच्चिदानंद म्हणजे सत्, चित्, आनंदमय म्हणजे शुद्धज्ञानस्वरूपी शाश्वत आनंदमय ब्रह्म.

भूमिका

भारत म्हणजे काय? देश, हवा, माती, पाणी, आभाळ, झाडं, माणसं... पण एवढं भिन्न खानपान, दिसणं, निसर्ग, भाषा असलेल्या या भूभागात पाश्चिमात्य राष्ट्रवाद ज्यात एक वंश, एक भाषा अश्या गोष्टी अपेक्षित आहेत तो येणार कसा... पण भारतात जी गोष्ट आहे ती म्हणजे एक सांस्कृतिक प्रवाह. असा प्रवाह जो सर्व भिन्नत्वाला सामावून घेत अखंड वाहत आहे.



जेव्हा भारत स्वतंत्र होत होता आणि सरदार पटेल सर्व संस्थानिकांना भेटत होते तेव्हा पहिल्याच सभेत त्यांनी सांगितले की 'भारतीयांपैकी काही जण (ब्रिटिश) प्रांतात तर काही जण संस्थानात राहतात. हा केवळ एक अपघात आहे. आपणा सर्वाची संस्कृती एकच आहे. आपण सर्व जण रक्ताने व हृदयाने एकसंध आहोत. ..तेव्हा आपणाला बंधुत्वाच्या व मित्रत्वाच्या नात्याने एकत्र बसून कायदे बनवायचे आहेत.. मातृभूमीवरील प्रेम व निष्ठेने प्रेरित होऊन आपल्याला एकत्र यावयाचे आहे.. आज आपण इतिहासाच्या निर्णायक ठिकाणी उभे आहोत.. एकत्र न येण्याच्या कारणाने पूर्वी आपण अनेकवेळा परकीयांचे गुलाम झालो होतो.. तेव्हा, बंधूंनो सहकार्य न करून.. ही सुवर्णसंधी वाया घालवून भावी पिढय़ांचा शाप घेऊ नका.' यात सरदारांनी भारतीय ही एक संस्कृती आपल्या सर्वांची आहे हे उद्धृत करून एकत्र येण्याबद्दल सांगितले. हा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे.

पण या संस्कृती बद्दल, आपल्या पूर्वजांबद्दल, एका राज्यातील माणसाला दुसऱ्या राज्यातील महापुरुषांबद्दल किती माहीत असतं? महाराष्ट्रातील माणसाला लाचित बडफुकन माहीत नसतात, उत्तर भारतातील माणसाला तिरुवल्लूवर माहीत नसतात आणि दाक्षिणात्याला रणजीतसिंह माहीत नसतात. किमान ही नावं आणि त्यांची प्राथमिक माहिती असावी म्हणून संघात आम्ही "एकात्मता स्तोत्र" म्हणतो. शिबिराच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात या स्तोत्राने होते.

या एकात्मता स्तोत्रातील सगळ्या बाबींची थोडक्यात माहिती लातूर येथील प्राध्यापक डॉ रमेश जोशी यांनी एका छोट्या पुस्तिकेत दिली आहे. ती माहिती त्यांच्या पूर्वपरवानगीने या ब्लॉग वर देत आहे.

अमृतसर

प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् । इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।। शीख पंथियांचे प्रमुख तीर्थस्थान असलेले हे पंजा...