अयोध्या मथुरा माया काशी काञ्चि अवन्तिका ।
वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया ।।६।।

शरयू नदीच्या किनारी वसलेली, प्राचीन कोसल परिसरातील, आत्ताच्या अयोध्या जिल्ह्यातील उत्तरप्रदेशातील अयोध्या ही प्रभू रामचंद्रांचे जन्मस्थान असलेली प्राचीन नगरी आहे. इक्क्ष्वाकुवंशी राजांची ही राजधानी होती. श्रीरामांच्या सुविख्यात रामराज्यानंतर त्यांचे पुत्र कुश यांनी आपली राजधानी बदलली व अयोध्येत श्रीरामाच्या जन्मस्थानी एक भव्य मंदीर बांधले. कालांतराने सम्राट विक्रमादित्याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
सुमारे एक हजार वर्षांपूर्वी या मंदिराचे नूतनीकरण करून जीर्णोद्धार करण्यात आला. ई. स. १५२८ मध्ये विदेशी क्रूर आक्रमक बाबराने या मंदिराचा विध्वंस करून त्यावर मशीद निर्मिण्याचा प्रयत्न केला. परंतु रामभक्तांच्या निरंतर सशस्त्र विरोधामुळे तो मशीद बनवू शकला नाही व त्याने बिना मिनारांचे तीन घुमट असलेला एक ढाचा बांधला. या ढाच्याखाली ध्वस्त केलेल्या मंदिराचे खांब, त्यांच्यावर कोरलेल्या मूर्त्या व मंगलकलशासहित अस्तित्वात आहेत. आज हे प्राचीन अवशेष संग्रहालयात ठेवलेले आहेत. मुख्य घुमटाखाली चंदनाच्या लाकडाचे खांब व प्रदक्षिणा मार्ग पण होता. साधू-संत-भक्त पिढ्या न पिढ्या इथे भजन पूजन करीत असत, परंतु क्रूर आक्रमक औरंगजेबाने त्याच्या सैन्यबळाच्या आधारे या पूजा-अर्चेवर बंदी आणली. श्रीरामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी हिंदू समाज निरंतर संघर्ष करीत राहिला परंतु विदेशी शासकाने वारंवार विध्वंस केला. गोस्वामी तुलसीदासांनी रामचरितमानसाची रचना अयोध्येतच केली आहे. विक्रम संवत १६३१ मध्ये गोस्वामीजी काशीहून अयोध्येत आले व श्रीरामनवमीच्या शुभदिनी रामचरितमानसाच्या रचनेस प्रारंभ केला. स्वाभाविकपणेच श्रीरामजन्मभूमीस्थानीच निवास करून त्यांनी ही रचना केली. त्यावेळी तीन घुमटांचा उध्वस्त ढाचा अस्तित्वात होता. गोस्वामीजींच्या शब्दात त्या काळात त्यांचा ध्यास होता, "माँगि कै खैबो मसीत को सोइबो लैबे को एक न दैबे को दोऊ".
देशातील प्रमुख संतमहात्म्यांच्या धर्मसंसदेतील निर्णयानुसार विक्रम संवत २०४६ मधील देवोत्थान एकादशीस श्रीरामजन्मभूमीवर भव्य मंदिराचा शिलान्यास झाला. २०४७ च्या देवोत्थान एकादशीस पुनश्च श्रीराम मंदीर पुनर्निर्माण कार्यास पुढे नेण्यासाठी लक्षावधी हिंदूंनी तिथे करसेवा केली. मुस्लिम अनुनय करणाऱ्या क्रूर सत्ताधाऱ्यांच्या अनेक जुलूमांना विरोध करून करसेवा झाली त्यावेळी बंदुकीतील गोळ्यांच्या वर्षावात अनेक रामभक्तांचे बलिदान झाले. परंतु रामकार्यासाठी सर्वस्वार्पण करण्याचा संकल्प भंग होऊ शकला नाही. ६ डिसेंबर १९९२ (इ. स.) या दिवशी राजकीय आक्रमकाची निशाणी ध्वस्त करून रामललाचे छोटे मंदीर लक्षावधी हिंदूंनी निर्मिले. या रामललाच्या छोट्या मंदिरास भव्य स्वरूप देण्याच्या कार्यात अनेक अडथळे आणले जात आहेत.
जैन तीर्थंकर आदिनाथांचा जन्मही अयोध्येतच झाला. बौद्ध साहित्यात अयोध्या नगरीस 'साकेत' हे नामाभिदान आहे. वाल्मिकी रामायणात भगवान श्रीरामांनी अयोध्या या जन्मभूमीस स्वर्गापेक्षा महान मानले आहे. रावणवधानंतर अयोध्येविषयी 'जननिजन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि' ही भावना व्यक्त करून श्रीराम हे अयोध्येत परत आले. सीता रसोई, हनुमान गढी सारखे प्राचीन स्थळे तसेच अनेक नवीन मंदिरांची ही नगरी जैन, बौद्ध, शीख आदी सर्व पंथियांची पावन तीर्थनगरी आहे. इथे अनेक जैन व बौद्ध मंदिरे आहेत.
No comments:
Post a Comment