Thursday, February 13, 2020

अमृतसर

प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् ।
इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।।

शीख पंथियांचे प्रमुख तीर्थस्थान असलेले हे पंजाबमधील धार्मिक व ऐतिहासिक नगर आहे. या नगरीतील तीर्थस्थळनिर्मितीचा शुभारंभ शीख पंथातील चौथे गुरू श्री रामदासजी यांच्याकडून इ. स. १५७७ मध्ये झाला. मंदीर निर्मितीपूर्वीच चहूदिशांनी एक तलाव खोदण्यात आला. मंदीर निर्मितीचे कार्य पाचवे गुरू अर्जुनदेवांनी हरिमंदिर बनवून पूर्ण केले. सरोवर व हरिमंदिराच्या चारही दिशांना भव्य दरवाजे आहेत, ज्यामुळे सर्व बाजूंनी श्रद्धाळू भक्तगण प्रवेश करतात. महाराज रणजितसिंह यांनी या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी खूप द्रव्य खर्च केले. १३ एप्रिल १९१९ रोजी इंग्रज शासनाच्या काळात या सुवर्णमंदिरापासून दोन फर्लांग अंतरावर असलेल्या जालियनवाला बागेत स्वातंत्र्यमागणी करणारी शांततापूर्ण सभा चालू असताना जनरल डायरने नृशंस गोळीबार केला, प्रचंड नरसंहार झाला. इथे या बलिदानी हुतात्म्यांच्या स्मरणार्थ स्मारक निर्मिलेले आहे. 

सोमनाथ

प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् ।
इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।।

गुजरातच्या दक्षिणी समुद्रकिनाऱ्यावर प्रभास नावाचे तीर्थस्थान प्राचीन काळापासून अत्यंत वैभव संपन्न नगर होते. येथील सोमनाथ नावाचे शिवमंदिर त्याच्या भव्यतेसाठी व वैभवसंपन्नतेसाठी जगात प्रसिद्ध होते. कालांतराने प्रभास नगर सोमनाथ नावानेच प्रसिद्ध झाले. लुटारू, आक्रमक महंमद गज़नवीने सोमनाथवर हल्ला करून मंदीर उध्वस्त केले. गज़नवीपासून औरंजेबापर्यंत मुसलमान वारंवार हल्ले करून मंदीर उध्वस्त करीत राहिले व पुन:पुन्हा हिंदूंकडून पुनर्निर्माणही होत गेले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलांच्या प्रयत्नांनी या मंदिराची अलीकडच्या काळात पुनर्बांधणी झालेली आहे.

इंद्रप्रस्थ

प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् ।
इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।।

महाभारतात उल्लेखिलेले, पांडवांनी वसविलेले हे नगर आत्ताच्या दिल्लीजवळ होते. असे मानले जाते की पूर्वी इथे खांडव नावाचे घनदाट अरण्य होते. ते जंगल तोडून नगर वसविले होते. दुर्योधनाच्या कपटनीतीनुसार त्यास हस्तिनापूर स्वतःस हवे असल्याने कुरुवंशीय राज्याचे विभाजन करून हा जंगली प्रदेश पांडवांना देण्यात आला होता. मय नावाच्या दानवाच्या अद्भुत स्थापत्यकलेमुळे कल्पनातीत इंद्रप्रस्थ निर्मिले गेले. युधिष्ठिराने येथेच राजसूय यज्ञ केला होता. इंद्रप्रस्थ नगरीने इतिहासात अनेक उत्थान-पतन पाहिले

विजयनगर

प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् ।
इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।।


 कलि युगाब्द ४४३७ (इ. स. १३३६) मध्ये पू. विद्यारण्यस्वामी (माधवाचार्य) यांच्या मार्गदर्शनाने हरिहर व बुक्कराय या वीरबंधूंनी विजयनगरच्या साम्राज्याच्या या राजधानी नगरीची निर्मिती केली. आपले गुरू विद्यारण्यस्वामींच्या नावावरून या नगरीस विद्यानगर हे नाव दिले गेले, कालांतराने विजयनगर म्हणून प्रस्थापित झाले. ही ऐतिहासिक नगरी तुंगभद्रा नदीकिनारी वसली होती. वेदमूलक हिंदूधर्म व संस्कृतीची सुरक्षा आणि संवर्धनाचे या साम्राज्याचे उद्दिष्ट होते. हिंदू साम्राज्य संस्थापक संगमवंशीयांनंतर सलुववंश, तुलुववंशीय पराक्रमी राजवंशांचे इथे अधिपत्य राहिले. तुलुववंशीय राजा कृष्णदेवरायांनी विजयनगर साम्राज्याचा उत्कर्ष केला आणि आक्रमक मुसलमानांनी उध्वस्त केलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धारही केला. विजयनगरचे हिंदू साम्राज्य युगाब्द ४४३७ ते ४६६६ (इ. स. १३३६ ते १५६५) पर्यंत उत्कर्ष पावलेले होते. या साम्राज्याचे विदेशांशी व्यवहार संबंध होते.

पाटलीपुत्र

प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् ।
इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।।

आज बिहारमध्ये असलेली बिहारची राजधानी म्हणजे प्राचीन पाटलीपुत्र नगरी होय. अनेक साम्राज्ये व राजवंशांची ही राजधानी राहिलेली ही नगरी, आज पटना म्हणून ओळखली जाते. प्राचीन काळात या नगरीस पाटलीपुत्र, कुसुमपूर, पुष्पपूर अथवा कुसुमध्वज या नावांनी ओळखले जात होते. गंगा आणि शोणभद्र नदीच्या संगमावर हे नगर वसले आहे. इसवीसनापूर्वी शेकडो वर्षे भगवान बुद्धांचे अनुयायी अजातशत्रू नावाच्या राजाने ही नगरी वसविली.स्वतः महात्मा बुद्धांनी या नगरीच्या परमोत्कर्षाविषयी भविष्यवाणी केली होती. ही नगरी दीर्घकाळपर्यंत मगध राज्याची राजधानी राहिली. या नगरीने नंद, मौर्य, शुंग आणि गुप्त वंशाच्या महान साम्राज्यांचे निर्मिती, उत्थान व पतन पाहिले आहे. शीख पंथाचे दहावे गुरूगोविंदसिंगजींचा जन्म याच नगरीत झाला. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसादांची ही कर्मभूमी राहिलेली आहे.

प्रयाग

प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् ।
इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।।

उत्तरप्रदेशात गंगा यमुनेच्या संगमावर वसलेलं 'प्रयागराज' हे प्राचीन प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, असाधारण महात्म्यामुळे यास तीर्थराज म्हटले जाते. सरस्वती नदीही गुप्त रूपाने याच संगमात विलीन होत असल्याने या स्थानास त्रिवेणीसंगम म्हटले जाते. प्रयागमध्ये दर वर्षी माघमेळा, दर सहा वर्षांनी अर्धकुंभ व प्रति बारा वर्षांनी विराट स्वरूपाचा कुंभमेळा संपन्न होत असतो. या प्रसंगी कोट्यावधी साधू, महात्मे, संत, श्रद्धाळू इथे पवित्र पर्वस्नान करतात. प्रजपतीने इथे यज्ञ केलेला असल्याने या क्षेत्रास प्रयाग हे नाव पडले असावे. भरद्वाज मुनींचा प्रसिद्ध गुरुकुल आश्रम इथेच होता. वनवासात जतेवेळी श्रीराम, सीता व लक्ष्मण इथे थांबले होते. संत तुलसीदास रचित रामचरितमानसानुसार इथेच याज्ञवल्क्य ऋषींनी भरद्वाजमुनीस श्रीरामकथा कथन केली होती. सम्राट समुद्रगुप्ताचे वर्णन असलेला एक उत्कृष्ट शिलास्तंभ प्रयागमध्ये प्राप्त झाला आहे. प्रलयकाळातही नष्ट होत नाही अशी मान्यता असलेला सुप्रसिद्ध अक्षयवटवृक्ष इथेच आहे. या श्रद्धाभावनेस नष्ट करण्यासाठीच आक्रमक मुसलमानांनी, प्रामुख्याने जहांगीरने हा अक्षयवटवृक्ष तोडण्याचे खूप प्रयत्न केले पण आजही तो विद्यमान आहे.

गया

अयोध्या मथुरा माया काशी काञ्चि अवन्तिका ।
वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया ।।६।।

पुराण, महाभारत व बौद्ध साहित्यात उल्लेखिलेले बिहार प्रांतातील फल्गू नदीकिनारी वसलेले गया हे प्राचीन नगर आहे. पुरणांनुसार गय नावाच्या महापुण्यवान विष्णुभक्त असुराच्या नावावरून या नगरीचे गया हे नामकरण झाले असावे. अशी मान्यता आहे की गयेमध्ये श्राद्ध पिंडदान केलेल्या व्यक्ती पापमुक्त होऊन ब्रह्मलोकात वास करतात. भगवान श्रीराम व धर्मराजाने इथेच पितृश्राद्ध केले होते. पितृश्राद्धासाठी हे प्रख्यात तीर्थक्षेत्र मानले जाते. विष्णूपदमंदीर हे येथील प्रमुख दर्शनीय स्थान आहे. गयेजवळच भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती. हे स्थान बोधगया किंवा बुद्धगया म्हणून प्रख्यात आहे. सुप्रसिद्ध बोधीवृक्ष तसेच भगवान महात्मा बुद्धांचे विशाल मंदीर येथे विद्यमान आहे.

तक्षशिला

अयोध्या मथुरा माया काशी काञ्चि अवन्तिका ।
वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया ।।६।।

सिंधू आणि वितस्ता (झेलम) नद्यांच्यामध्ये भारताच्या पश्चिमोत्तर सीमाप्रदेशात गांधार जनपदाची द्वितीय राजधानी राहिलेली तक्षशिला ही प्राचीन ऐतिहासिक नगरी. ताक्षशिलेचे भग्नावशेष आजही पाकिस्तानातील रावळपिंडीच्या ३० किमी अंतरावर विद्यमान आहेत. श्रीरामाचे बंधू भारत यांनी त्यांचा पुत्र तक्ष याच्या नावाने ही नगरी वसविली होती. प्राचीन भारतातील सुप्रसिद्ध विद्याध्ययन केंद्र म्हणून तक्षशिलेची ख्याती होती. ज्ञात इतिहासात जगात सर्वाधिक दीर्घकाळ चाललेले, १२०० वर्षे निरंतर चाललेले विश्वविद्यालय येथे होते. तक्षशिलेच्या या जगद्विख्यात विश्वविद्यालायात पाणिनी, जीवक, कौटिल्यासारख्या महान विभूतींनी अध्ययन व अध्यापन केले आहे. प्राचीन भारतातील राजकीय व व्यापारी केंद्र म्हणूनही ताक्षशिलेची ख्याती होती. एरियन, स्ट्रेटो इ. ग्रीक इतिहासकार तसेच चिनी प्रवासी फाहीयान यांनी या नगरीच्या संपन्नतेचे वर्णन लिहून ठेवले आहे. सीमावर्ती प्रदेशात असल्याने या नगरीस राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते. पश्चिमोत्तर दिशेकडून होणाऱ्या आक्रमणांना या नगरीने वारंवार यशस्वी तोंड दिले आहे. भारताच्या विभाजनानंतर आता हे स्थान पाकिस्तानात गेले आहे.

पुरी (जगन्नाथ पुरी)

अयोध्या मथुरा माया काशी काञ्चि अवन्तिका ।
वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया ।।६।।

ओडिशामध्ये गंगासागर किनाऱ्यावर जगन्नाथ पुरी हे शैव, वैष्णव आणि बुद्ध संप्रदायाचे केंद्र आहे, जिथे वर्षभर दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. भारतातील चार प्रमुख धमांपैकी हे एक आहे. जगद्गुरू आद्य शंकराचार्य द्वारा स्थापित गोवर्धन मठ तसेच चैतन्यमहाप्रभूचा मठही इथे आहे. सुप्रसिद्ध जगन्नाथ मंदीर करोडो लोकांचं श्रद्धास्थान आहे. ज्यास पुराणांमध्ये पुरुषोत्तम तीर्थ म्हटले जाते. गंगवंशीय अनंतचोल गंग राजाने आजचे जगन्नाथ मंदीर १२व्या शतकात बांधले, परंतु ब्रह्मपुरण व स्कंदपुराणानुसार या पूर्वीच उज्जयिनी नरेश इंद्रद्युम्नाने हे मंदीर बांधले होते. या मंदिरात श्रीकृष्ण, बलराम व सुभद्रेच्या काष्ठमूर्ती आहेत. दरवर्षी होणारी जगन्नाथाची विशाल रथयात्रा ही देशातील प्रमुख महान रथयात्रा असते. लक्षावधी लोक हा जगन्नाथाचा रथ श्रद्धेने वाहून नेत असतात. या स्थानाची विशेषता म्हणजे इथे जातीपाती, स्पृश्यास्पृश्य असा भेदभाव केला जात नाही. याविषयी एक लोकोक्ती प्रसिद्ध आहे की, "जगन्नाथ का भात, जगत् पसारे हाथ, पूछे जात न पात". पुरीमधील सिद्धिविनायक मंदिरातील विनायकाची मूर्ती ही मूर्तिकलेच्या दृष्टीने अप्रतिम प्रेक्षणीय मानली जाते.

द्वारिका

अयोध्या मथुरा माया काशी काञ्चि अवन्तिका ।
वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया ।।६।।

प्राचीन काळात भगवान श्रीकृष्ण द्वारा निर्मित गणराज्याची ही राजधानी आजच्या गुजरातमध्ये सौराष्ट्राच्या पश्चिमी समुद्रतटावर वसली आहे. द्वारिका ही हिंदूंच्या पवित्र चार धमांपैकी एक आहे. द्वारिकेमध्ये रैवत नावाच्या राजाने दर्भ पसरून एक यज्ञ केला होता. रणछोडराज मंदिरावर फडकणारा धर्मध्वज जगातील सर्वात मोठा धर्मध्वज आहे. रणछोडराज हे द्वारकाधीश श्रीकृष्णाचेच एक रूप मानले जाते. याच मंदिरपरिसरात जगद्गुरू आद्यशंकराचार्य द्वारा स्थापित शारदा मठ आहे. भगवान श्रीकृष्णाच्या निजधामगमनानंतर द्वारकेचा बहुतांश भाग समुद्रात बुडाला. उपग्रहावरून घेतलेल्या चित्रांवरून समुद्रात गेलेल्या द्वारकेचाही आता शोध लागलेला आहे.

वैशाली

अयोध्या मथुरा माया काशी काञ्चि अवन्तिका ।
वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया ।।६।।
 
प्राचीन काळातील वज्जीसंघ व लिच्छवी गणाराज्यांची आता बिहारमध्ये असलेली प्रसिद्ध प्राचीन नगरी वैशाली एकेकाळी भव्यता व वैभवसंपन्नतेसाठी देशात सुप्रसिद्ध होती. चोविसावे जैन तीर्थंकर भगवान महावीरांचा जन्म इथेच झाला. यामुळे जैन पंथाचे हे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र व श्रध्दाकेंद्र आहे. भगवान बुद्धांच्या काळात भारतातील प्रमुख सहा नगरींपैकी वैशाली एक होती. भगवान बुद्धांचे वास्तव्य इथे दीर्घकाळ राहिले. इक्ष्वाकू वंशातील विशाल राजाच्या नावावरून या नगरीचे वैशाली हे नामकरण झाल्याचे मानले जाते. भगवान श्रीरामांनी मिथिलेस जतेवेळी या नगरीचे अवलोकन केले होते.

अवन्तिका

अयोध्या मथुरा माया काशी काञ्चि अवन्तिका ।
वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया ।।६।।

मध्यप्रदेशात क्षिप्रानदीकिनारी वसलेली ही प्राचीन नगरी आता उज्जयिनी किंवा उज्जैन म्हणून प्रसिद्ध आहे. या नगरीचीही गणना सात मोक्षपुरींमध्ये होते. भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाकाल नावाच्या ज्योतिर्लिंगाचे हे पीठ असून देवी सतीच्या बाहूचा एक अंश इथे पडल्यामुळे या नगरीस शक्तीपीठही मानले जाते. भगवान शंकरांनी याच ठिकाणी त्रिपुरासुरावर विजय गाजवला होता. आचार्य सांदीपनींचा आश्रम इथेच होता, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण, बलराम व सुदामाने विद्याध्ययन केले होते. विद्याकेंद्रांच्या रूपात अवंतीचे महत्त्व दीर्घकाळ टिकून राहिलेले आहे. भारतीय जोतिषशास्त्रानुसार भूमध्यरेषा व शून्य रेखांशाच्या केंद्रबिंदूवर ही नगरी वसलेली आहे. प्रतिबाराव्या वर्षी अवन्तिकेमध्ये कुंभमेळा भरत असतो. मौर्य शासनकाळात उज्जैनी मालव प्रदेशाची राजधानी होती. सम्राट अशोकाचा पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्राने इथेच सन्यासदीक्षा घेतली होती. कालांतराने इथे शकांचे राज्य प्रस्थपित झाले, ज्यांना विक्रमादित्याने पराभूत केले. कालिदास, अमरसिंह, वररूची, भर्तृहरी, भारवी इत्यादी प्राचीन भारतातील श्रेष्ठ भाषाशास्त्री तसेच सुविख्यात ज्योतिषाचार्य वराहमिहीराचा अवंतिकेशी दीर्घकाळ संबंध राहिला आहे. इथे क्षिप्रा नदीकिनारी सिद्धवटवृक्ष चिरकाळापासून अस्तित्वात आहे. प्रयागमधील अक्षयवटाप्रमाणे या सिद्धवटवृक्षास नष्ट करण्याचे मुस्लिम आक्रमकांनी अनेक प्रयत्न केले, परंतु जहांगीरसह कुणीही त्यांच्या या दुष्टप्रयत्नात यशस्वी झाले नाहीत.

कांची


अयोध्या मथुरा माया काशी काञ्चि अवन्तिका ।

वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया ।।६।।

कांची: सात मोक्षपुरींपैकी एक असे कांची हे दक्षिण भारतात सुप्रसिद्ध धार्मिक नगर व विद्येचे केंद्र आहे. या नगरीस दक्षिण काशी म्हटले जाते. प्राचीन काळापासून हे नगर शैव, वैष्णव, बौद्ध व जैन पंथियांचे तीर्थक्षेत्र मानलेले आहे. या नगरीचे शिवकांची व विष्णुकांची हे दोन विभाग मानले जातात. कांचीमध्ये कामाक्षी आणि
एकांबरनाथ मंदिरे प्रसिद्ध आहेत. या नगरीत १०८ भगवान शंकराची स्थाने मानली जातात. विष्णुकांचीमध्ये वरदराजाचे भव्य मंदिर आहे. रामानुजाचार्यांच्या तत्त्वज्ञानाचा स्रोत कांचीमध्येच आहे. बौद्ध पंडितांमधील नागार्जुन, बुद्धघोष, धर्मपाल, दिङ्नाग इत्यादींचा निवास कांचीमध्येच होता. ब्रह्मांडपुराणात काशी व कांचीला भगवान शंकराचे नेत्र मानले गेले आहे.

अमृतसर

प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् । इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।। शीख पंथियांचे प्रमुख तीर्थस्थान असलेले हे पंजा...