अयोध्या मथुरा माया काशी काञ्चि अवन्तिका ।
वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया ।।६।।
ओडिशामध्ये गंगासागर किनाऱ्यावर जगन्नाथ पुरी हे शैव, वैष्णव आणि बुद्ध संप्रदायाचे केंद्र आहे, जिथे वर्षभर दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. भारतातील चार प्रमुख धमांपैकी हे एक आहे. जगद्गुरू आद्य शंकराचार्य द्वारा स्थापित गोवर्धन मठ तसेच चैतन्यमहाप्रभूचा मठही इथे आहे. सुप्रसिद्ध जगन्नाथ मंदीर करोडो लोकांचं श्रद्धास्थान आहे. ज्यास पुराणांमध्ये पुरुषोत्तम तीर्थ म्हटले जाते. गंगवंशीय अनंतचोल गंग राजाने आजचे जगन्नाथ मंदीर १२व्या शतकात बांधले, परंतु ब्रह्मपुरण व स्कंदपुराणानुसार या पूर्वीच उज्जयिनी नरेश इंद्रद्युम्नाने हे मंदीर बांधले होते. या मंदिरात श्रीकृष्ण, बलराम व सुभद्रेच्या काष्ठमूर्ती आहेत. दरवर्षी होणारी जगन्नाथाची विशाल रथयात्रा ही देशातील प्रमुख महान रथयात्रा असते. लक्षावधी लोक हा जगन्नाथाचा रथ श्रद्धेने वाहून नेत असतात. या स्थानाची विशेषता म्हणजे इथे जातीपाती, स्पृश्यास्पृश्य असा भेदभाव केला जात नाही. याविषयी एक लोकोक्ती प्रसिद्ध आहे की, "जगन्नाथ का भात, जगत् पसारे हाथ, पूछे जात न पात". पुरीमधील सिद्धिविनायक मंदिरातील विनायकाची मूर्ती ही मूर्तिकलेच्या दृष्टीने अप्रतिम प्रेक्षणीय मानली जाते.

No comments:
Post a Comment