अयोध्या मथुरा माया काशी काञ्चि अवन्तिका ।
वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया ।।६।।
मध्यप्रदेशात क्षिप्रानदीकिनारी वसलेली ही प्राचीन नगरी आता उज्जयिनी किंवा उज्जैन म्हणून प्रसिद्ध आहे. या नगरीचीही गणना सात मोक्षपुरींमध्ये होते. भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाकाल नावाच्या ज्योतिर्लिंगाचे हे पीठ असून देवी सतीच्या बाहूचा एक अंश इथे पडल्यामुळे या नगरीस शक्तीपीठही मानले जाते. भगवान शंकरांनी याच ठिकाणी त्रिपुरासुरावर विजय गाजवला होता. आचार्य सांदीपनींचा आश्रम इथेच होता, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण, बलराम व सुदामाने विद्याध्ययन केले होते. विद्याकेंद्रांच्या रूपात अवंतीचे महत्त्व दीर्घकाळ टिकून राहिलेले आहे. भारतीय जोतिषशास्त्रानुसार भूमध्यरेषा व शून्य रेखांशाच्या केंद्रबिंदूवर ही नगरी वसलेली आहे. प्रतिबाराव्या वर्षी अवन्तिकेमध्ये कुंभमेळा भरत असतो. मौर्य शासनकाळात उज्जैनी मालव प्रदेशाची राजधानी होती. सम्राट अशोकाचा पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्राने इथेच सन्यासदीक्षा घेतली होती. कालांतराने इथे शकांचे राज्य प्रस्थपित झाले, ज्यांना विक्रमादित्याने पराभूत केले. कालिदास, अमरसिंह, वररूची, भर्तृहरी, भारवी इत्यादी प्राचीन भारतातील श्रेष्ठ भाषाशास्त्री तसेच सुविख्यात ज्योतिषाचार्य वराहमिहीराचा अवंतिकेशी दीर्घकाळ संबंध राहिला आहे. इथे क्षिप्रा नदीकिनारी सिद्धवटवृक्ष चिरकाळापासून अस्तित्वात आहे. प्रयागमधील अक्षयवटाप्रमाणे या सिद्धवटवृक्षास नष्ट करण्याचे मुस्लिम आक्रमकांनी अनेक प्रयत्न केले, परंतु जहांगीरसह कुणीही त्यांच्या या दुष्टप्रयत्नात यशस्वी झाले नाहीत.
No comments:
Post a Comment