महेन्द्रो मलयः सह्यो देवतात्मा हिमालयः ।
ध्येयो रैवतको विंध्यो गिरिश्चारावलिस्तथा ।।४।।
भारताच्या उत्तरेस असलेला, सदैव बर्फाच्छादित, जगातील सर्वोच्च पर्वत, ज्यास कविकुलगुरू कालिदासांनी 'देवतात्मा' या विशेषणाने संबोधित केलेले आहे. (अस्युतरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः) उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणांना रोखण्यात भक्कम भिंतीप्रमाणे हिमालयाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. हा पर्वत भारतातील अनेक नद्यांचे उगमस्थान आहे. गंगा, यमुना, सिंधू, ब्रह्मपुत्रा या सारख्या अनेक नद्या हिमालयातून उगम पावल्या आहेत. भगवान शंकराचे प्रिय निवासस्थान कैलास सुद्धा हिमालयावरच आहे. नर-नारायणाचे पवित्र स्थान याच पर्वतावर आहे. गंगोत्री, यमुनोत्री, मानसरोवर, बद्रीनाथ, केदारनाथ सारखे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र याच पर्वतशृंखलावर विराजमान आहेत. हिमालयाच्या क्षेत्रातच महाराज भगीरथाने गंगेच्या प्रवाहित होण्यासाठी घोर तपश्चर्या केली होती. याच पर्वतावर देवी पार्वतीने जन्म घेतला, ज्यांनी आपल्या महान तपश्चर्येने भगवान शंकराला पतिरूपाने प्राप्त केले. भगवान वेदव्यासांनी याच पर्वतांमध्ये अनेक महान ग्रंथांची रचना केली. महाभारत युद्धानंतर पांडवांनी हिमालय गमन करून ऐहिक जीवन कृतार्थ केले होते. भारतातील अनादी काळापासून सांस्कृतिक सनातन जीवनगाथा हिमालयाशी जोडलेल्या आहेत. युगानुयुगे हिमालय हा ऋषी, मुनी, योगी, तपस्वी, दार्शनिकांचे निवासस्थान राहिलेला आहे.

No comments:
Post a Comment