प्रकृति: पञ्चभूतानि ग्रहा लोका स्वरास्तथा ।
दिश: कालश्च सर्वेषां सदा कुर्वन्तु मङ्गलम् ।।२।।
प्रकृती: सांख्य दर्शनानुसार सृष्टीचे मूळ उपादान कारण (व्यक्त होण्याचे कारण) मूळ स्वरूपत:च जड (अचेतन), अमूर्त (निराकार) आणि त्रिगुणात्मक (सत्व-रज-तम) आहे, हेच "प्रकृती" या नावाने ज्ञात आहे. प्रकृतीचे तीन गुण आहेत, सत्व, रज आणि तम, यांच्या साम्यावस्थेमध्ये सर्व काही अमूर्त, निराकार असते. अशा जड प्रकृती मध्येही चैतन्यमय ईश्वरी तत्त्वाच्या सान्निध्याने चेतनेचा आभास निर्माण होतो. सत्व, रज, तमाचे साम्य भंग होऊन हे गुण परस्परांचे दमन करून प्रत्येक गुण प्रभावी होण्याचा प्रयत्न करतो व या क्रियाकलापांमुळे चेतनेचा आभास निर्माण होत असतो. या सोबतच सृष्टीक्रम प्रारंभ होतो. अद्वैत दर्शनामध्ये सृष्टीला मिथ्या किंवा आभासी मानले जाते. वास्तविकपणे एकंदरीत भारतीय विचारांमध्ये चेतनाभासी प्रकृती व मिथ्या मायेला एकाच शक्तीची दोन रूपे मानले गेले आहे.
पंचमहाभूते: भारतातील जनसामान्यांनाही आपले शरीर पंचमहाभूतांनी बनलेले असल्याची दार्शनिक संकल्पना अवगत आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश या तत्त्वांना पंचमहाभूते म्हटले आहे. सांख्य दर्शनानुसार सृष्टीक्रमामध्ये सत्व, रज, तम या गुणांचे संतुलन बिघडताच शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पाच गुण आणि पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभूतांचे सृजन होऊन पुन्हा विश्वनिर्मिती होत असते. ही पंचमहाभूते स्थूल स्वरूपात नसून सूक्ष्मरूपात असतात.
ग्रह: सामान्यपणे सौरमंडलातील सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या स्थूल पदार्थपिंडांना ग्रह म्हणतात. ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या सौरमंडलात मंगल, बुध, गुरू, शुक्र व शनी नावाचे पाच ग्रह आहेत, या व्यतिरिक्तही सूर्य, चंद्र तसेच राहू, केतू हेही खगोलशास्त्रीय ग्रह मानले जाऊन एकूण नऊ ग्रह मानले जातात. या सर्व ग्रहांची निर्मिती व अस्ताच्या वेळा तसेच गतीचे अध्ययन गणित ज्योतिषामध्ये केलेले आहे. फलज्योतिषानुसार सर्व ग्रहांच्या गतिविधींचा शुभाशुभ प्रभाव पृथ्वीवरील प्राणीमात्रावर पडत असतो.
गुरुत्वाकर्षणामुळे समुद्रातील भरती-ओहोटीसारखे दृश्य परिणाम होतात तसेच विद्युतचुंबकीय प्रभावास आधुनिक विज्ञानही मान्यता देते. पुराणांमध्ये राहू व केतूचा उल्लेख एका राक्षसाचे धड व कापलेल्या मुंडाक्याच्या रूपात केला जातो. समुद्रमंथनानंतर या राहू-केतूंनीच देवांमध्ये जाऊन चोरून अमृत पिल्याचा उल्लेख आहे. चंद्र-सूर्याकडून ही माहिती मिळताच विष्णूने सुदर्शन चक्रानी त्याचा शिरच्छेद केला होता. मंगलकार्याच्या वेळी नवग्रहांची पूजा केली जात असते.
लोक: वेदांमध्ये अनेक लोकांचा उल्लेख आहे, प्रकाशमय देवलोक तसेच अंधःकारमय असूरलोकाचा उल्लेख आहे. पुराणांमध्ये खलील चौदा लोकांचे वर्णन केले आहे - भूलोक, भुवर्लोक, स्वर्लोक, महर्लोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक हे सात ऊर्ध्वलोक आहेत. पुढील सात अधोलोक आहेत - अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताळ. या चौदा लोकांना चौदा भुवने सुद्धा म्हणतात. भूलोक हा कर्मलोक आहे. मनुष्यजन्म आणि कर्माचा आधार असलेला हा भूलोक आहे. या लोकापासून सर्व ऊर्ध्वलोकांमध्ये शुभकर्म करणाऱ्या सत्प्रवृत्त प्राणिमात्रांचा निवास असतो तर सर्व अधोलोकांमध्ये अशुभ कर्म करणाऱ्या अधम प्रवृत्तीच्या प्राणिमात्रांचे वास्तव्य असते.
स्वर: भारतीय दर्शनानुसार आकाशामध्ये "शब्द" गुण आहे परंतु इथे शब्दाचा अर्थ ध्वनी नसून कंपन तरंग असा आहे. शब्दांची ध्वनी रूपात अभिव्यक्ती म्हणजे "स्वर" होय. स्वराज नादब्रह्मही म्हटलेले आहे.
संगीत शास्त्रात ध्वनीच्या मूळ स्रोतांना श्रुती म्हटले आहे व या श्रुतीची संख्या २२ आहे. एकापेक्षा अधिक श्रुतीच्या नादमय संयुक्त रूपास स्वर म्हटले जाते. संगीतामध्ये एका सप्तकात पुढील सात स्वर असतात: षड्ज, ऋषभ, गंधार, मध्यम, पंचम, धैवत, निषाद ( सा रे ग म प ध नि) या सात स्वरांचा क्रम पूर्ण होताच यापेक्षा दुप्पट आवृत्तीचे दुसरे सप्तक सुरू होत असते. भारतीय संगीतातील या तीन सप्तकांना अनुक्रमे मंद्र, मध्य आणि तार सप्तक म्हणतात. या सर्व शुद्ध स्वरांच्या व्यतिरिक्त कोमल ऋषभ, कोमल गंधार, तीव्र मध्यम, कोमल धैवत आणि कोमल निषाद या पाच विकृत स्वरांनाही भारतीय संगीतामध्ये मान्यता दिलेली आहे.
भारतीय भाषांच्या वर्णमालेतील अ, आ, इ, ई... इत्यादी १४ वर्णाक्षरांच्या ध्वनीउच्चारणाचे स्वतंत्र स्वरूप असते. तसेच क्, ख्, ग्, घ् ङ् इत्यादी व्यंजन वर्णाक्षरांसहित ध्वनीउच्चारण केल्यानंतर स्वतंत्र, पृथक स्वरूपात उच्चारण होते. उच्चारणातील तीव्रतेच्या दृष्टीनेही उदात्त, अनुदात्त व स्वरित असे तीन स्वर प्रकार आहेत.
दिशा: पुढील दहा दिशा आहेत - पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय (दक्षिण पूर्व), नैऋत्य (दक्षिण पश्चिम), वायव्य (उत्तर पश्चिम), ईशान्य (उत्तर पूर्व), ऊर्ध्व (वर) व अध: (खाली)
काल: घटनांमध्ये पूर्वी व नंतरचा बोध होणाऱ्या प्रत्ययांचा गती आणि परिवर्तनाशी संबंध असतो. भारतीय तत्त्वज्ञांनी काळास चक्रीय किंवा पुनरावर्ती मानलेले आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुगांचे वारंवार पुनरावर्तन होत असते. या प्रमाणेच भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळाचे सुद्धा निरंतर पुनरावर्तन सुरूच असते. भारतीय कालगणनेमध्ये 'निमिष' (म्हणजे पापणी झडपण्याइतपत वेळ) पासून कल्प (म्हणजे सृष्टीच्या एका अस्तित्वाचा काळ) पर्यंत विचार झालेला आहे. उपरोक्त चार युगांचे एक महायुग (४३ लक्ष २० हजार वर्षे) आणि १००० महायुगांचे एक कल्प होत असते. पुराणानुसार हे कल्प म्हणजे सृष्टीकर्ता ब्रह्माचा एक दिवस असतो. हा एकवेळ सृष्टीच्या अस्तित्वाचा कालावधी आहे. हे एक कल्प पूर्ण होताच महाप्रलय होऊन सृष्टीचे विसर्जन होते व पुन्हा सृष्टीचे सृजन सुरू होते. हे उत्पत्ती, स्थिती व लयाचे चक्र निरंतर सुरू असते.
तीन गुणांनी युक्त प्रकृती, पंचमहाभूते, नऊ ग्रह, तीन लोक किंवा सात ऊर्ध्वलोक व सात अधोलोक, सप्तस्वर, दशदिशा आणि तीन काळ सदैव सर्वांचे मंगल करोत.


No comments:
Post a Comment